तोंडापूर: भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तोंडापूर येथे नापिकीला कंटाळून ६७ वर्ष शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाऊराव आनंदा अपार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे तोंडापूर शिवारात चार ते पाच एकर शेती आहे. मेहनत करूनही पीक हाती न आल्याने कर्ज परतफेड कशी करावी या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. काल सकाळी कापूस वेचण्यासाठी पाणी काढायला गेलेल्या महिलांना आत्महत्येचा प्रकार लक्षात आला.
सध्या महाराष्ट्रात असलेली पूरग्रस्त स्थिती व ओल्या दुष्काळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीची पूर्णपणे नासाडी झालेली आहे व त्यात सत्तास्थापनेच्या खेळामध्ये रमलेले हे नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या समस्येकडे ढुंकूनही पाहत नाही. तर दुसरीकडे विमा कंपन्यांचाही प्रश्न उभा ठाकला आहे.