कर्नाटक, ३ ऑगस्ट २०२३: दक्षिणेतून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करीत काँग्रेसच्या कर्नाटक विजयाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. भेटी दरम्यान सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना राज्यातील पारंपारिक हत्तींची कलाकृती भेट स्वरूपात दिली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी कर्नाटकची निःशुल्क तांदूळ वितरण योजना ‘अन्न भाग्य’ साठी केंद्राकडून तांदूळ पुरवठा करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दसऱ्या निमित्त कर्नाटकमध्ये ‘एअर शो’चे आयोजन करण्याची विनंती सिद्धरामय्या यांनी केली आहे. यापूर्वी बुधवारी सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. कर्नाटक भवन येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आणि डॉ. सुनीलम यांची भेट घेत सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांचे विविध मुद्दे आणि समस्यांसंबधी चर्चा केली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर