कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडी कडून पुन्हा समन्स

नवी दिल्ली, ३ ऑक्टोंबर २०२२: कर्नाटकातील कॉंग्रेस नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डी. के.सुरेश यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. आज ( ३ सप्टेंबर ) या पदयात्रेचा कर्नाटकात चौथा दिवस आहे. डी. के. शिवकुमार हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यातच आता ईडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहेत.

‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

ईडीने समन्स बजावून डी. के शिवकुमार यांना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फेडरल तपास संस्थेसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी डी. के. शिवकुमार यांची चौकशी करण्यात आली होती.

त्यावेळी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांना सांगितले होते की, एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. मात्र, मला या प्रकरणाबाबत काहीच माहिती नाही. चौकशीवेळी ईडी अधिकाऱ्यांनी माझ्या ट्रस्ट आणि भावाकडून यंग इंडियाला देण्यात आलेल्या पैशांबद्दल विचारले, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले होते. दरम्यान, यंग इंडिया ही नॅशनल हेराल्ड च्या मालकीची कंपनी असून नॅशनल हेराल्ड प्रकरणात आतापर्यंत ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांची चौकशी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा