कर्नाटक सरकार अन्नभाग्य योजनेत निम्मे तांदूळ, निम्म्या तांदळाचे पैसे देणार, तांदूळ टंचाईवर मंत्रिमंडळ निर्णय

बंगळूर, २९ जून २०२३: राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजना राबविण्यात येणार असून, आता १० किलोमध्ये प्रति व्यक्ती निम्मे तांदूळ, तर निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ किलो तांदूळ व ५ किलो तांदळाचे प्रती किलो ३४ रुपये दराने प्रतिमहिना १७० रुपये प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार आहेत. योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. यामध्ये अन्नभाग्य योजनेबाबत चर्चा करण्यात आली. केंद्राने तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर निम्मा तांदूळ पुरवण्याबरोबरच निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे थेट जमा करण्यात येणार आहेत.

राज्यातील बीपीएल आणि एपीएल शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारकडून तांदूळ पुरवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला २ लाख २९ हजार टन तांदळाची आवश्यकता आहे. इतक्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा करण्याची कोणत्याही राज्याची क्षमता नाही. बाजारात तांदळाचे दरही वाढल्याने अडचण निर्माण झालीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा