वर्ल्डकप साठी निवड झाल्यावर कार्तिकचं भावनिक ट्विट, यावर हार्दिकचं मन जिंकणारं उत्तर

पुणे,१४ सप्टेंबर २०२२ : आशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट प्रेमींना टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. ऑक्टोबर मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघाने तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची पुन्हा एकदा टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

दिनेश कार्तिक तर कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यामुळे तो निवृत्तीच घेणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण आयपीएल २०२२ मध्ये आरसीबी कडून दमदार खेळी करत सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या जोरावर त्यानी थेट टीम इंडिया मध्ये एन्ट्री मिळवली आणि आता आगामी टी २० विश्वचषकासाठी संघात त्याने जागा मिळवली आहे. २००७ मध्ये पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकातील तो भारतीय संघाचा भाग होता.

संघात निवड झाल्यानंतर डिके ची प्रतिक्रिया हे आज वरचे सर्वोत्तम ट्विट आहे. दिनेश कार्तिकने ट्विटरवर लिहिलं ‘स्वप्न पूर्ण होतंय’ यासोबत त्यानं ब्ल्यू हार्ट ही टाकला आहे. यावर हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटवर दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. कार्तिकच्या पोस्टवर कमेंट करताना पांड्याने ‘चॅम्पियन’ असं लिहिलं.

दिनेश कार्तिकने २००४ मध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात पहिला सामना खेळला. त्याच वर्षे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. २००६ मध्ये खेळलेल्या पहिल्या टी २० सामन्यात कार्तिक संघाचा भाग होता. त्यानंतर बराच काळ तो संघाबाहेर देखील राहिला. ३७ वर्षीय कार्तिकने आत्तापर्यंत आपल्या टी ट्वेंटी कारकिर्दीत ५० सामन्यात १३९ पेक्षा जास्त स्ट्राईकरेटने ५९२ धावा केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा