कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना मिळणार पदोन्नती

मुंबई : २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जीव धोक्यात घालून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून देणाऱ्या मुंबईतील १४ पोलिसांना पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह अन्य १४ पोलिसांनी कसाबला पकडण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना एका रँकने पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला समुद्रमार्गे आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले होते. त्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांपैकी इस्माइल खान व अजमल कसाब हे दहशतवादी स्कोडा कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.
गिरगाव येथे तैनात पोलिसांनी त्यांची कार अडवून त्यांना घेरले. त्यावेळी झालेल्या चकमकीत इस्माइल खान मारला तर बंदुकधारी कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले होते.
कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ ला फाशी झाली होती. मात्र, तो जिवंत पकडला गेल्यामुळेच मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते.
संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाटला होता. याच कामगिरीची दखल घेऊन पोलिसांना बक्षीस दिले जाणार आहे. अशी माहितीही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा