जंगलतोड आणि भ्रष्टाचाराला मोठा दणका! मुळशीतील काशिग ग्रामपंचायत बरखास्त सरपंच-उपसरपंच अपात्र

शासकीय वनजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात घोर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुळशी तालुक्यातील काशिग ग्रामपंचायत अखेर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बरखास्त केली आहे. या कारवाईत थेट सरपंच वर्षा राहुल कदम आणि उपसरपंच लक्ष्मी सोपान तिडके यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. स्थानिक राजकारणातील ही एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

तक्रारींची दखल, चौकशीत सत्य उघड

ग्रामस्थ नामदेव टेमघरे, योगेश टेमघरे, अर्जुन शिंदे, शंकर टेमघरे, शिवाजी तिडके आणि राघू टेमघरे यांनी ॲड. रणजित टेमघरे यांच्यामार्फत २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी करण्यात आली.

चौकशीत शासकीय वनजमिनीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण आणि प्रशासनातील निष्काळजीपणा स्पष्टपणे सिद्ध झाला. या ठोस पुराव्यांमुळे प्रशासनाच्या वतीने वन खात्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या निष्काळजीपणाच्या कारणास्तव सरपंच वर्षा कदम यांना पूर्वीच अपात्र ठरवले होते. आता विभागीय आयुक्तांनी संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.

गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्णयाला आव्हान देणार

या प्रशासकीय निर्णयाचे तक्रारदार नामदेव टेमघरे यांनी जोरदार स्वागत केले आहे. ते म्हणाले, “या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत. प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत आता विकासकामे पारदर्शकपणे राबवली जातील.” दुसरीकडे, बरखास्त केलेल्या सरपंच वर्षा कदम यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “गावगाड्यात ठरल्याप्रमाणे सदस्यांनी अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर राजीनामे दिले होते, त्यामुळे ग्रामपंचायत अल्पमतात आली होती. आम्ही या निकालाच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत.” या धडाकेबाज कारवाईमुळे शासकीय मालमत्तेचे रक्षण होईल आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव राहील, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे