पुणे: कात्रज चौकातील उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर करू. तसेच त्यासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. हे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी(दि.१५) पुणे येथे दिले.
कात्रज-देहूरोड बायपास रस्त्यावरील कात्रज चौक ते नवले ब्रिजपर्यंतच्या रस्त्याच्या सहा पदरी करण्याच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार भिमराव तापकीर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे उपस्थित होते.
यावेळी गडकरी यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रुंदीकरणाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. फक्त पुणे-सातारा या टप्प्यातील कामे रेंगाळली आहेत. ती आमच्या खात्याकडून नाही, तर स्थानिक ठेकेदार आणि काही लोकांमुळे रखडली आहेत. पण आता त्यांना वठणीवर आणण्यात येईल आणि ही उर्वरित कामे वेगाने होतील.’
तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. येथील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून साऊंड बॅरिकेटिंग बसविण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे शिवसृष्टीला येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे होणार आहे.
या कार्यक्रमाआधी गडकरी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीची पाहणी केली.