विभागीय जिल्हास्तरीय युवा महोत्सवात के.सी.ई. सोसायटीच्या ‘कान्ह ललित कला केंद्राची’ गगनभरारी, राज्यस्तरावर नाशिक विभागाचे करणार प्रतिनिधीत्व

जळगाव ९ डिसेंबर २०२३ : जळगाव जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात, के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राने ६ डिसेंबर रोजी नाशिक येथील विभागीय महोत्सवात ९ बक्षिसांसह विजेतेपद पटकावले असून आता त्यांची पुणे येथे राज्यस्तरावर निवड झाली आहे. कान्ह ललित कला केंद्र आता नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या यशाबद्दल के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागातर्फे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या संकल्पना आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश केेलेले आहेत. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी युवा महोत्सवासाठी नियम व सूचना आधारित निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यासंदर्भात युवा महोत्सव घेण्याचे सूचित केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली होती.

नाशिक येथील विभागीय महोत्सव पार पडला असून यात यात प्राथमिक, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर युवांना आपल्या कला दाखवण्याचा आणि त्यात पारंगत होण्याचा बहुमान मिळत असतो. त्याचप्रमाणे त्यांना शासनातर्फे प्रमाणपत्रांसह रोख रकमेचेही बक्षिस मिळत असल्याने यामुळे युवांचा उत्साह द्विगुणित होत असतो. यात आता कान्ह ललित कला केंद्राने बाजी मारली असून पुढील २० डिसेंबर रोजी होणार्‍या राज्यस्तरीय महोत्सवासाठी चमू सज्ज झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रा. मिलन भामरे, प्रा. पीयूष बडगुजर, दिनेश माळी, अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्र्रसाद कासार, प्रा. कपिल शिंगाने, प्रसाद कासार आणि प्रा. वैभव मावळे यांनी मार्गदर्शन केले.

‘कान्ह ललित कला केंद्राला’ या कलाप्रकारात मिळाली बक्षिसे-
एकांकिका – प्रथम, समूह नृत्य – प्रथम, रांगोळी – प्रथम, पोस्टर- प्रथम आणि द्वितीय, समूह लोकगीत गायन – तृतीय, लोकनृत्य (एकल) -द्वितीय, फोटोग्राफी – द्वितीय.

कान्ह ललित कला केंद्र हे नेहमी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी कार्य करत असते. एक समन्वयक म्हणून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक जेवढे करावे, ते कमीच आहे. यापुढेही ही कामगिरी अशीच राहणार यात शंका नाही. अशा शब्दात के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.

विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर मिळवलेल्या यशाने भारावून न जाता राज्यस्तरावर नाशिक विभागाचा आणि कान्ह ललित कला केंद्राचा डंका कसा गाजवता येईल, याची रणनीती सुरू आहे. शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय स्तर गाठण्याचा मानस आहे. असे मत प्रा. प्रसाद देसाई, कान्ह ललित कला केंद्र, संचालक यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा