गोल पोस्ट महाराष्ट्र कल्याणच्या ए अँड जी रुग्णालयाला केडीएमसीचा दणका , रुग्णालयाचा कोवीड दर्जा रद्द.

कल्याणच्या ए अँड जी रुग्णालयाला केडीएमसीचा दणका , रुग्णालयाचा कोवीड दर्जा रद्द.

कल्याण,२८ जुलै २०२०:गेल्या काही दिवसांत केडीएमसीमध्ये कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसली आहे. मात्र या रुग्ण संख्येबरोबरच रुग्णाची होणारी लूट गांभीर्यांनी समोर आली आहे. आत्तापर्यंत बिलवाढी बद्दल अनेक तक्रारी या महापालिकेकडे गेल्या .

शासकीय दरांपेक्षा अधिक दर आकारणी करून कोवीड रुग्णांची लूट केल्याचा आरोप कल्याण पश्चिमेच्या मुरबाड रोड परिसरात असणाऱ्या ‘ए अँड जी’ या खासगी रुग्णालयावर केला आहे. त्याचबरोबर कोवीड रुग्णालयाचा दर्जा केडीएमसीने काढून घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णालयाची नोंदणी निलंबनाची कारवाई केली आहे.

महापालिकेच्या भरारी पथकाने केलेल्या चौकशीत या रुग्णालयाने १९ रुग्णांच्या बिलांमध्ये ९ लाख ३६ हजार ६१८ रुपये जास्तीचे आकारले गेले आहेत .

टोसीलीझुमॅब इंजेक्शनसाठी एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेतले गेले . त्याबाबत केडीएमसीच्या नोटीसींना रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले.

या अति गंभीर स्वरूपाच्या अनियमिततांमधून रुग्णालयाने कोवीड रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने या रुग्णालयावर ही कारवाई केल्याचे सांगितले.

तसेच या रुग्णालयात कोवीडचे नविन रुग्ण घेण्यावरही मनाई आदेश लागू करण्यात आले असून सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर शासकीय दरात उपचार होण्याचे निश्चित करण्यासाठी केडीएमसीतर्फे वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याखाली केलेली नोंदणीही ३१ ऑगस्टपर्यंत निलंबित केली आहे. तसेच जोपर्यंत रुग्णालय प्रशासन या सर्व अनियमितता दूर करून संबंधित रुग्णांना आकारलेले जास्तीचे पैसे परत करत नाही तोपर्यंत नोंदणीचे निलंबन राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version