सातारा २८ जून २०२३: सातारा जिल्ह्याच्या परळी खोऱ्यातील केळवळी धबधबा आता ओसंडून वाहू लागला आहे. शेकडो फुटांवरुन कोसळणारा हा धबधबा, त्या खाली पाण्याचे तळे आणि मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाहत येणारे फेसाळणारे शुभ्र पाणी हा निसर्गाचा आविष्कार मन मोहवून टाकतो.
या पाण्यातून आसमंतात उडणारे तूषार धबधब्यापर्यंत जाण्याआधीच आपल्याला चिंब भिजवून टाकतात. हिरव्यागार झाडाझुडपातून आणि दगडाच्या कडी कपारीतून उंचच उंच दुधाच्या धारा जणू जमिनीवर पडत असल्याप्रमाणे, पांढराशुभ्र पाण्याचा स्रोत वाहू लागला आहे. हा निसर्ग अनुभवायचा असेल तर या परिसरात गेलंच पाहिजे.
परळी खोऱ्यात डोंगरदऱ्यातून सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे कधी पाऊस तर कधी ऊन आणि त्यातून मधूनच येणारे दाट धूके यामुळे हा परिसर विलोभनीय वाटू लागला आहे. जाताना उरमोडी धरणांचे विहांगम दृश्य तसेच पायवाटेने जाताना हिरवेगार डोंगर पक्षांचा किलबिलाट हे सर्व पाहताना निसर्गाचा उत्तम साक्षात्कार होतो.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर