पंढरपूर, २० जुलै २०२१: दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. कोरोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली होती; मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती. पुष्पांनी सजलेल्या शिवशाही बसेसमधून संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या.
यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. केशव शिवदास कोलते (७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) (रा. संत तुकाराम मठ, वर्धा) यांना यंदाच्या महापूजेचा मान मिळाला. बडेकेशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून १९७२ पासून महिन्याची वारी करीत असत . गेल्या २० वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता येत नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे