खडकवासला धरणाचे पाणी झाले दूषित

पुणे: पुणे शहरासाठी पाणी पुरवठा करणारे धरण म्हणजे खडकवासला. या खडकवासला धरणावर लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु ते जेव्हा आपल्या सोबत आणणाऱ्या खाण्यासाठी आणलेल्या वस्तू खाऊन झाल्याबर तिथेच ठेवतात. त्यामुळे धरण पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे प्रदूषित होताना दिसत आहे.
धरणाच्या पाण्यावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे रिकामे पॅकेट, शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या तरंगताना दिसत आहेत. खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याचा तवंग आलेला दिसत आहे.
सिंहगड, पानशेत, खडकवासला या भागात सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या भागात येणारे पर्यटक खडकवासला धरणावर थांबतात.

त्यांनी सोबत आणलेली शीतपेये, पाणी बाटल्या, खाद्यपदार्थांचा वापर झाल्यानंतर उरलेला कचरा थेट धरणाच्या पाण्यामध्ये फेकतात. कित्येक पर्यटक धरणाच्या कडेला बसून स्वतःच्या सुटीचा आनंद घेतात. मात्र त्यांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे लाखो पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसत आहे.

काही तरुण-तरुणी तर रात्रीच्या वेळी धरणाच्या कडेला बसूनच मद्यप्राशन करतात. आणि त्या रिकाम्या बाटल्या धरणाच्या पाण्यात फेकून देतात.असे वागणाऱ्या पर्यटकांमुळे सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे.

त्यामुळे प्रशासनाने धरण परिसरात अशा समाज विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच हा पाण्यावर साठलेला कचरा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

धरणावर काम करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कित्येक वेळा भिंतीजवळ आलेला कचरा काढला आहे. कर्मचाऱ्यांनी काढलेले कचऱ्याचे ढीग दिसत आहेत; परंतु पर्यटकांची संख्या जास्त असल्याने कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.
हा कचरा असाच वाढत गेला तर पाणी दूषित होऊ शकते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पाण्यावर साठलेला कचरा त्वरित काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा