गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रातून ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणीसाठी काम सुरू

पुण्यात खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रातून ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणीसाठी काम सुरू

पुण्यातील वर्तुळाकर मार्गाच्या पश्चिम भागात, खडकवासला धरणाच्या पाणलोट भागामधून सांगरूण येथून मालखेड गावाला जोडण्यासाठी उड्डाणपूल बांधले जाणार आहे. या पुलासाठी पाइल फाउंडेशन पद्धतीने खड्डे खोदून खांब उभारले जात आहेत. हा उड्डाणपूल सुमारे ६५० मीटर लांब असेल आणि एकूण २७६ खड्डे घेण्यात येणार आहेत. आतापर्यंत पाण्यात ५९ खड्डे खोदले गेले आहेत.

उड्डाणपूलासाठी उभारण्यात येणारे खांब स्टील, काँक्रिट किंवा लाकडाचे असतील. यात १५६ खड्डे जमिनीत आणि १२० खड्डे पाण्यात घेतले जातील. पुल ८ पदरी असणार असून खांबांमधील अंतर ४० ते ६० मीटर असेल. हा रस्ता द्रुतगती मार्ग असल्याने स्थानिक लोकांना थेट फायदा होणार नाही, पण काही वर्षांत रिंग रोडवरून जाणाऱ्या वाहनांना धरणाचे सुंदर दृश्य अनुभवता येईल.

धरणाजवळील काम एप्रिलपासून सुरू झाले असून, नवयुगा कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे. उड्डाणपूलाचे अभियंता रितेश भारद्वाज म्हणाले की, पाइल फाउंडेशन पद्धतीने खड्डे खोदून पुलासाठी खांब उभारले जात आहेत.

पुण्याचा रिंग रोड पश्चिम आणि पूर्व भागात साकारला जाणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे नियोजन आहे की, अडीच वर्षांत हा रिंग रोड पूर्ण होईल. हा रिंग रोड पुरंदर, हवेली, भोर, खेड, मावळ, मुळशी या सहा तालुक्यांतील ८२ गावांतून जातो. पश्चिम रिंग रोडसाठी २२,५३६ कोटी, पूर्वसाठी १९,७४१ कोटी आणि पूर्व भागाच्या विस्तारासाठी १३,३४४ कोटी रुपये खर्च येणार असून एकूण ५५,६२२.३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

MSRDC चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी पश्चिम रिंग रोडचा परिसर पाहिला आणि कामांना गती देण्यासाठी आदेश दिले आहेत. या उड्डाणपूलामुळे रिंग रोडचा विकास जलद होईल आणि भविष्यात पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version