राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गोविंद बागेत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर्षीची दिवाळी साजरी करणार नाही. त्यांच्या मते, राज्य सरकार ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे, त्या पद्धतीने करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात राजकारण आणले जात आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले की, दिवाळीच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला की, दिवाळी साजरी करायची नाही. कारण गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती उध्वस्त झाली, जमीन खरडून गेली आणि शेतकरी अस्वस्थ झाला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मानसिक आणि आर्थिक कल्याण विचारात घेतला गेला पाहिजे, म्हणूनच दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शरद पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या संघटनेला यात राजकारण करायचे नाही, पण ज्यांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे, त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. सध्या राज्य सरकारने केलेली मदत अल्प आहे आणि त्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी पुरेसा नाही. शेतकऱ्याची जमीन हेच त्याचं सर्वस्व आहे, आणि या महापुरात ते सर्वस्व हरवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीसंबंधी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
शरद पवार म्हणाले की, संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारला मदतीसाठी तयारी दाखवली, पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी सरकारची दिसत नाही. या परिस्थितीमुळे आजची दिवाळी साजरी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील