मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: भाजपशी नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून अनेक चर्चांना उधाण उठलं होतं. परंतु अखेर या चर्चांना पूर्णविराम लावत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित होते. आपल्या भाषणात नाथाभाऊंनी भाजपवर पुन्हा आरोप केला. ते म्हणाले, “मला विधानसभा निवडणुकीवेळी खूप त्रास देण्यात आला. मी काय गुन्हा केला म्हणून मला छळण्यात आलं, हे मी विचारत होतो, पण ते मला आतापर्यंत सांगण्यात आलं नाही. तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते.”
“ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करेल. भाजप ज्या वेगानं वाढलं, त्याच्या दुप्पट वेगानं मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेल. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं.”
“जळगावमध्ये पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. आतापर्यंतच सगळ्यांत मोठा कार्यक्रम होईल. जळगावमधील सगळ्यात मोठं ग्राऊंड ओतप्रोत भरून दाखवेल. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण, काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो. जर शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे