मुंबई : केंद्र सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याचं खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे कबूली दिली आहे.
औरंगाबाद येथे मासिआतर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
यावेळी गडकरी यांनी सांगितले की, सरकार कुठल्याही पक्षाचं येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच. तुम्ही सगळ्या गोष्टींची सोंगं करू शकता, पण पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर ‘पीपीपी’चा मार्ग स्वीकारावाच लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या इंडस्ट्रीयल रोडबाबत दुसऱ्या टप्यात विचार करू, सध्या काही सांगू नका.
तसेच आता नवीन काही करता येणार नाही. ज्या घोषणा केल्या ती कामे पूर्ण करू द्या, असंही गडकरींनी म्हटलं आहे.
अगोदर आमचं ‘काम’ कर मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा आग्रह मराठवाड्यातील आमदार, खासदार धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार कामे सोडून पळून जात आहेत, असंही गडकरींनी सांगितलं.