खऱ्या बैलजोडी बरोबरच मातीच्या बैलाकडे ही लोकांनी फिरवली पाठ

पुरंदर, दि. ३ जुलै २०२०: पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागातील गावात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र आता लोकांकडे बैलच नसल्याने अनेक जण मातीच्या बैलाची पूजा करतात. यावर्षी मात्र या बैलांच्या मूर्ती खरेदी करण्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

बेंदूर किंवा बैलपोळा हे सण अनेक वर्षापासून साजरे केले जातात. शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा असलेला हा सण आता मागे पडत चालला आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण आले आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैलं पहिल्यासारखे दिसेनाशी झाली. जी कामे बैलांमार्फत केली जात होती, ती आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून होऊ लागली आहेत. त्यामुळे बैलांच्या गोठ्यातील जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. मात्र लोकांच्या मनातील बैलजोडी अजूनही टिकून आहे. म्हणूनच अनेक शेतकरी मातीचे बैल घेऊन त्याची बेंदरा दिवशी किंवा पोळ्या दिवशी पूजा करत असतात.

मात्र असे असले तरी उद्या होणाऱ्या बेंदूर सणासाठी मातीचे बैल जोडी घेण्याकडे मात्र लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील वीर, जेऊर, मांडकी, नीरा, पिंपरे, गुळूंचे या गावांमधून बेंदूर सण साजरा केला जातो. तालुक्यात सगळीकडेच कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता अनेक लोक घरातून बाहेर पडायला नको म्हणतायत. बैलं घरी आणून पुजन करण्याची हौस जरी असली, तरी बाहेर पडल्यावर गर्दीतून कोरोना आपल्याकडे येतोय की काय? याबाबतची धास्ती लोकांच्या मनात आहे. त्यामुळे गाव खेड्यातील लोक शहरी किंवा निमशहरी भागात जाऊन या मातीच्या बैलजोडी खरेदी करण्यासाठी उत्सुक नाहीत आणि म्हणूनच आज पुरंदर मधील नीरा येथील बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या मातीच्या बैलजोडीला मागणी अत्यंत कमी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५०% सुद्धा मातीच्या बैलजोडीची विक्री होणार नाही, असे येथील कुंभार व्यवसायिक निखिल कुंभारराजे यांनी सांगितले. त्याचबरोबर या वर्षी मातीच्या या बैलजोडीच्या किंमतीमध्ये वीस टक्के वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा