खातेवाटपागोदरच अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कॅबिनेटऐवजी पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनाम दिला. सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे ‘अर्जुन’ अर्थात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे प्रयत्नही निष्फळ ठरल्याचं चित्र आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते.

सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा