खालापूर, रायगड १ जुलै २०२४ : खालापूर तालुका हा औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे .मात्र गेल्या काही महिन्यांपासून खोपोली व खालापूर तालुक्यात वीज पुरवठ्यात येणाऱ्या सततच्या व्यत्ययामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झालाय. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नव्याने स्थापन केलेल्या खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातुन महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.
खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी राजेंद्र फक्के, सुभाष पोरवाल,अजित जैन,अशोक ठकेकर,महेश जाखोटिया,दिवेश राठोड,प्रशांत साठे,जुझार खोपोलीवाला,शरद शिंदे,राकेश ओसवाल, नितेश कसबे,समीर साठे तसेच इंडस्ट्रिअल कडून अनिल खालापूरकर,अश्पाक लोगडे,धर्मराज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हर्डीकर,हानीफ दुदूके, मोहन केदार,सुरेखा खेडकर, नम्रता परदेशी,दाऊद शेख,गणेश राक्षे, जितेश हाडप,इशिका शेलार,आरती यादव,गायत्री जाधव,बनीता साह,विनोद राजपूत,साबीर पटेल, दिलीप पाटील,संजय कचरे, ईश्वर कासार, किशोर साळुंखे,फिरोज पिंजारी, शेखर परब,संतोष गायकर, सचिन पवार,इरफान शेख,अदनान शेख यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता सतीश गढरी यांना कार्यालयातच घेरून त्यांच्या व महावितरणच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढले.
दर मंगळवारी सातत्याने शटडाऊन व गेल्या तीन मंगळवारी प्रत्येकी सात तासाहून अधिक शट डाऊन घेऊनही शहरातला वीज पुरवठा शनिवारी पूर्णपणे बंद होता. रविवारीही अनेकदा व्यत्यय आले. याबद्दल तालुक्यांतीलनागरिक खूप प्रक्षुब्ध झाले होते. सात दिवस तरी अखंडपणे वीज देण्याची लेखी मागणी यावेळी करण्यात आली. यावर उप कार्यकारी अभियंता सतीश गढरी यांनी पायाभूत समस्या दूर करण्यासाठी आणखी तीन महिने तरी लागतील अशी भूमिका घेऊन लेखी हमी देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे सर्व जण खूप संतप्त झाले. त्यांनी वीज पुरवठा नियमित होईपर्यंत बिले न भरण्याचा गंभीर इशारा देऊन अधिकारी लेखी हमी देत नाहीत म्हणून कार्यालयाबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थितांनी महावितरणची अकार्यक्षमता, हलगर्जीपणा, भ्रष्टाचार अशा आरोपांची चौफेर हल्लेबाजी केली.
महावितरणच्या बेजबाबदारपणाची शिक्षा तालुक्यातील प्रत्येक कुटुंब भोगत आहे. सक्तीची बिल वसुली करणाऱ्या महावितरणने सुधारणा न केल्यास येत्या आठ दिवसात लढा उभारला जाईल तसेच यातून वाद अथवा तेढ निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा स्थानिक व्यापारी सुभाष पोरवाल व राजेंद्र फक्के यांनी दिला आहे. कारखानदारी संपुष्टात आणण्याची सुपारी घेवून काम करणाऱ्या महावितरणचा अनिल खालापूरकर, आश्पाक लोगडे,धर्मराज पाटील यांनी तांत्रिक भाषेत समाचार घेतला.
न्यूज अनकट प्रतिनीधी : दत्तात्रय शेडगे