राजगुरूनगर : श्री स्वामी सेवा प्रतिष्ठान संचलित किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. खेडमधील चंद्रमा गार्डन येथे हा कार्यक्रम पार पडला.
वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर सूर धरत नृत्य सादर केली. या चिमुकल्या मुलांमधील कलागुण पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे स्त्रीरोग तज्ञ डॉ. शेखर घुमटकर व डॉ.सविता घुमटकर , आदर्श शिक्षक राजेंद्र पाचपुते , उज्वला पाचपुते हे उपस्थित होते. पाहुणे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम सुरू होण्याअगोदर शाळेने पालकांसाठी विविध प्रकारच्या फन फेअर गेम्स आयोजित केलेल्या होत्या. यामध्ये पालकांनी सर्व खेळाचा आनंद लुटला. त्यानंतर विद्यार्थ्यांची पारंपारिक नृत्य ही झाली तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी व शाळेने शेतकऱ्यांची व्यथा समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक मोलाचा संदेश दिला. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पाहुण्यांनी शाळेचे व प्राचार्या अनिता शिंदे यांचे कौतुक केले. शाळेतील वर्षभर झालेल्या स्पर्धेची बक्षीस वाटप राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे व संचालिका हेमलता टाकळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अनिता शिंदे तर सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी केले.