किल्ल्यांनी जपला.. ऐतिहासिक वारसा

विसापूर किल्ला

“पुण्याकडे जाताना लोणावळा सोडल्यानंतर लोहगड-विसापूर हे दोन डोंगर गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते.मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावर नजरेस पडतो.”

विसापूर किल्ला हा ३०३८फूट उंची असलेला किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. पुणे जिल्हयातील लोणावळा डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम असा समजला जातो. पवणामावळात मोडणारा आणि लोणावळा घाटाचे संरक्षण हा किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असणारा हा किल्ला इतिहासात आपले फार काही स्थान मिळवू शकला नाही.
१६८२ मध्ये मराठे पुण्याच्या उत्तरेकडे स्वारीसाठी गेले. पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्यावर तो त्या ठिकाणी पोहोचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६०हुन अधिक लोकांची कत्तल करण्यात आली. तिथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजते. १६८२ मध्ये मराठे आणि मोगलांचा शिवा शिविचा खेळ सुरु होता.
४मार्च १८१८रोजी जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी इंग्रजांनी विसापूर जिंकला त्या दिवशी मराठे लोहगड सोडून गेल्याची माहिती आहे.

गडावर जाताना एक हनुमान मंदिर लागते.बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते.मात्र पावसाळ्यात या गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावर लांबवर पसरलेली तटबंदी सर्वाना आकर्षित करते. गडावर एक मोठं जातही आहे.
मुंबई -पुणे लोहमार्गारील मळवली स्थानकावर उतरून भाजे गावात जावे.तिथून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग आहेत. पहिल्या वाटेने जायचे ठरल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. तसेच भाजे भाजे लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला जातो. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांजवळ पोहोचतो.
दुसऱ्या वाटेने भाजे गावातून खिंडीपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते. गडावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. जेवनाची सोय स्वतःची स्वतःला करावी लागते. पूर्ण गडावर चढण्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागतो.

असा हा इतिहासामध्ये असून देखील आपले स्थान निर्माण न करता आलेला विसापूर किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने सध्या आकर्षणाचे केंद्र बिंदू बनत आहे. किल्ला हिरवाईने नटलेला असल्यामुळे आकर्षक आणि सौंदर्याने नटलेला दिसत आहे.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा