केंजळगड
“केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वराच्यादरम्यान महादेव डोंगरावर उभारलेला आजे. बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.”
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली.
१६४८ साली हा किल्ला आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता.१६७४मध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. तोपर्यंत वाई आणि परिसरातील इतर किल्ले राजांच्या ताब्यात आले होते. परंतु केंजळगड येणे बाकी होते. म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वासराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने मराठ्यांशी लढताना चोख प्रतिउत्तर दिले. परंतु नंतर तो मराठ्यांच्या हातून मारला गेला. आणि २४ एप्रिल १६७४मध्ये मराठ्यांनी केंजळगड जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा किल्ला औरंगजेबाकडे गेला.मात्र एका वर्षाने पुन्हा तो मराठ्यांकडे आला. २६मार्च १८१८साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्लिट्झर याने किल्ल्याचा ताबा घेतला.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, ‘जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर तो जिंकणे फार अवघड आहे.
केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे. भोरहून कोरले, वडतुंबीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपर्यंत चालत जाता येते. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे. गडावर रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. हा एक अतिशय उत्तम जिना कोरला आहे.
डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्नी लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत; पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत. पण केंजळगड केवळ ह्या पायऱ्यासाठी पाहायला जायला हवा .या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली. ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.
केंजळगडास जाण्याचा रस्ता आहे. महाराष्ट्र सरकारने गडाच्या पायथ्यापर्यन्त गाडी जाईल असा रस्ता बनवला आहे. खावली गावात असलेल्या श्री. नवलाई देवी आणि श्री.रामवरदायिनी देवीचे दर्शन घेऊनच पुढे निघावे. केंजळगड हा इतर किल्यांच्या तुलनेत वेगळा होता