किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा – लोहगड

76

“लोहगड किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्ध कालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याकाळी म्हणजे इ.स.पूर्व सातशे वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे इतिहासकारांच्या अनुमानातून निघते.”
=========================

सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाही ची स्थापना केली. आणि त्याने त्यावेळी अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी च लोहगड हा एक किल्ला. इ.स.१५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैद होता.

इ.स.१६६५ मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला.त्यानंतर १३मे १६७० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्यावेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी याच गडावर ठेवली होती.१७१३मध्ये शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. त्यानंतर तो आंग्रे कडून तो पेशव्यांकडे आला.नंतर १७७०मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले त्याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे कारभार सोपवला. नानांनी या किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत केले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली. व तिच्या बाजूला एक शिलालेख कोरून ठेवला आहे.

१८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी घेतला. पण दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा ताब्यात घेतला. ४मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड किल्ला जिंकण्यासाठी आला होता. परंतु त्याने त्यावेळी प्रथम विसपूरचा किल्ला जिंकला. ज्या दिवशी इंग्रजांनी विसापूर किल्ला जिंकला त्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्रज लोहगड सोडून निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याला महत्वाचे स्थान आहे.

                                                                                                         – प्रशांत श्रीमंदिलकर