किंग्जस इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा केला १२ धावांनी पराभव

दुबई, २५ ऑक्टोबर २०२०: किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला आहे. पंजाबने हैदराबादला विजयासाठी १२७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव १९.५ ओव्हरमध्ये ११४ धावांवरच गुंडाळला. पंजाबच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना नीट खेळता आले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक गोलंदाजी करत पंजाबला ११४ धावांवर रोखले. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ३५ तर विजय शंकरने २६ धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डन या जोडीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी. मुर्गन आश्विन आणि रवी बिश्नोई या तिकडीने प्रत्येकी १ विकेट टीपत अर्शदीप आणि ख्रिसला चांगली साथ दिली.

विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने ५६ धावांची भागीदारी केली. हैदराबादला पहिला धक्का ५६ धावांवर बसला. वॉर्नर ३५ रन्सवर आऊट झाला. यानंतर हैदराबादने दुसरी आणि तिसरी विकेट झटपट गमावली. त्यामुळे हैदराबादची ६७-३ अशी परिस्थिती झाली. मात्र यानंतर मनिष पांडे आणि विजय शकंरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ख्रिस जॉर्डनने मनिष पांडेला १५ धावांवर आऊट केलं. यानंतर हैदराबादने पंजाबच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं. हैदराबादने एकामागोमाग एक विकेट गमावले. हैदराबादच्या ३ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान हैदराबादचा पराभव करत पंजाबचा हा यंदाच्या मोसमातील सलग चौथा विजय ठरला.

दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले. पंजाबने २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १२६ धावा केल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद ३२ धावा केल्या. तर त्यानंतर कर्णधार लोकेश राहुलने २७ रन्स केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशिद खानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पंजाबला पहिला धक्का ३७ धावांवर लागला. मनदीप सिंह १७ धावांवर बाद झाला. यानंतर ख्रिस गेल २० धावा करुन माघारी परतला. गेलनंतर कर्णधार लोकेश राहुल आऊट झाला. त्याने २७ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने आजही निराशा केली. मॅक्सवेल १२ धावांवर तंबूत परतला. दीपक हुड्डा भोपळा न फोडताच बाद झाला. ख्रिस जॉर्डन ७ धावांवर आऊट झाला. मुर्गन आश्विन ४ रन्सवर धावबाद झाला. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज दिली. त्याने २८ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. यात त्याने २ फोर लगावले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा