“किरीट सोमय्या हे भाजपचे संजय राऊत”, शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांचं सोमय्यांना प्रत्युत्तर

मुंबई, 9 जुलै 2022: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजप सोबत आपलं नवीन सरकार स्थापन केलंय. सरकार स्थापन होऊन आठवडाही झाला नाही तर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांच्या उद्धव ठाकरेंवरील विधानामुळं शिंदे गटातील आमदार संतापलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर सोमय्यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं की, ‘मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्या बदल अभिनंदन केले.’ उद्धव ठाकरेंना माफिया मुख्यमंत्री म्हटल्याबद्दल शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप घेतला आहे.

शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी सोमय्या यांच्या ट्विटवर आक्षेप घेत म्हटलं की, किरीट सोमय्या हे भाजपचे संजय राऊत आहेत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “प्रत्येक पक्षात संजय राऊत असतातच. तसेच किरीट सोमय्या हे भाजपचे संजय राऊत असावेत असं मला वाटतं. संजय राऊत काहीही बोलतात, त्यांना कोण आडवतं. यामुळं लोकांची मनं दुखवतात. आमदार निघून गेले, खासदार निघून जाण्याची वेळ आलीय.”

“ठाकरे साहेबांचा मान राखणं ही सरकार बनवतानाची अट होती. ती अट सर्वांनी पाळली. मी आज देवेंद्रजींना भेटलो तेव्हा त्यांच्याही भावना अशाच होत्या. ठाकरे कुटुंबीय हे महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यांची बदनामी होता कामा नये.”

सत्तेची परवा नाही- शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही किरीट सोमय्या यांच्या ट्विट बद्दल संताप व्यक्त केलाय. किरीट सोमय्यांनी असे काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा – शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ,उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समझ किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये व यापुढं त्यांनी असं वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा