किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ दाखवताना थोडेफार बंधन ठेवावे, निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

मुंबई, १८ जुलै २०२३ : विधिमंडळ कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्त वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजणार हे निश्चित होते. आज त्याचे विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार पडसाद उमटले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी करण्यात येईल,असे जाहीर केले.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि अनिल परब सभागृहात या कथित व्हिडिओवरुन आक्रमक झाले.अंबादास दानवे यांनी या व्हिडीओ संदर्भात पेनड्रॉइव्ह सभापतींना सादर केला.अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधान परिषद सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना काय चिंता वाटते, ते सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली. पण एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, तो म्हणजे दोन-तीन वाहिन्यांवर वारंवार हे शॉट्स दाखवले जात आहेत. मी विनंती करते, हे सरकारने करावे असे म्हणणार नाही. आलेला व्हिडिओ ब्लर करता येतो, पण काय कृत्य चाललय ते वारंवार दाखवले जाते. मला असे वाटते व्हिडिओ दाखवताना थोडफार बंधन ठेवावे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचणे शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणे म्हणजे खूप कठीण काम आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचे मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे? असा सवाल निलम गोऱ्हेनी उपस्थित केला. त्या महिलेची तक्रार आली पाहिजे. ती भगिनी कोणी ऐकत असेल, तर तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. या विश्वासाचा घात होत असेल, तर त्यावर गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महत्वाची आहे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा