Gahunje Assault Case: गहुंजे येथील एका प्रतिष्ठित सोसायटीत किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किशोर भेगडेविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भेगडेचा मुलगा आदित्य भेगडे आणि त्याचे मित्र क्लब हाऊसमध्ये खेळत असताना पार्टीत बोलावण्याच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद किशोर भेगडेच्या लक्षात येताच तो संतप्त झाला आणि त्याने मुलाच्या मित्रांना गाठून त्यांना अमानुष मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात किशोर भेगडे एका १५ वर्षीय मुलाच्या पोटात जोरदार मुक्का मारताना स्पष्ट दिसत आहे.
या गंभीर मारहाणीनंतर श्वेता अंकुश तिवारी यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार (जीवे मारण्याचा प्रयत्न) किशोर भेगडेविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. काल त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे उच्चभू सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































