जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचा भरदिवसा खून

मावळ, १२ मे २०२३: मावळ तालुक्यातील उधोगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर आज भरदुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने वार केला गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जोडलेल्या किशोर आवारे यांनी सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगर परिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणातील आपले स्थान पक्के केले होते.

आज दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर गोळीबार व कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. दरम्यान त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने पूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मावळ पोलीसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा