मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही काळात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
मात्र विराट कोहलीने नुकतेच २००० सालापासून सौरवदादाने कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून ‘टीम इंडिया’ जिंकायला लागली’, असे विधान केले.
कोहलीच्या या वक्तव्याचा माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी खरपूस समाचार घेत भारत ७० च्या आणि ८० च्या दशकातही क्रिकेट सामने जिंकत होता, असे सुनावले आहे.
यावर गावसकर म्हणाले की, सौरव गांगुली सध्या ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष आहे म्हणून विराट कोहलीने खूश करण्यासाठी त्याचे गोडवे गायले. मात्र, भारत ७० च्या आणि ८० च्या दशकातही क्रिकेट सामने जिंकत होता. त्यावेळी विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता.
अनेकांना असे वाटते की, २००० सालापासून भारतात क्रिकेट सुरू झाले. मात्र, त्यांना मला सांगावेसे काटते की, १९७० मध्येही ‘टीम इंडिया’ने परदेशात सामने जिंकलेले आहेत.
१९८६ साली भारताने इतर उपखंडातही सामने जिंकले. इतकेच नव्हे, तर भारताने परदेशात कसोटी मालिकाही अनिर्णित ठेवली आहे.
दरम्यान, गावसकर यांच्या या वक्तव्यामुळे आता विराट – गावसकर असा वाद रंगण्याची शक्यता आहे.