कोजागरी पौर्णिमेचा उत्साह यंदा दुधाच्या विक्रमी मागणीसह साजरा झाला आहे. पुणे शहर आणि उपनगरांत सार्वजनिक मंडळे, सोसायट्या व संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कोजागरी साजरी होत असल्याने दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ नोंदवली गेली. पुणे शहरात दररोज १७ ते १८ लाख लिटर दुधाची विक्री होते, मात्र कोजागरीच्या निमित्ताने ही विक्री तब्बल २२ लाख लिटरवर पोहोचल्याचा अंदाज आहे—म्हणजेच सुमारे ३.५ ते ४ लाख लिटर दुधाची जादा विक्री झाली.
यंदा कोजागरी पौर्णिमा दोन दिवस असल्याने मंगळवारीही (दि. ७) दुधाला मागणी कायम राहणार आहे. गणेश पेठेतील घाऊक बाजारात (दूध भट्टी) सोमवारी (दि. ६) अडीच ते तीन हजार लिटर दुधाची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक वाढलेली असली तरी घाऊक बाजारात एक लिटर दुधाला ८० रुपये असा भाव मिळाला. गेल्या वर्षी हा भाव ८३ रुपये होता. १८ लिटर दुधाच्या घागरीला १४५० रुपये दर मिळाला.
अरण्येश्वर, खडकी, लष्कर, मुंढवा, वाडेबोल्हाई, वाघोली, केसनंद तसेच भोर, वेल्हा अशा ग्रामीण भागातूनही दुधाची मोठी आवक झाली.
नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत दुधाला असलेली ही मागणी कायम राहणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणामुळे स्थानिक गवळीवाडे कमी होत आहेत. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यासोबतच अन्य जिल्ह्यांतूनही दुधाचा पुरवठा शहराला केला जात आहे, अशी माहिती दूध बाजार अध्यक्ष रामदास काळे यांनी दिली. कोजागरीच्या उत्साहात दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे