कोजागिरी पौर्णिमेची रम्य सायंकाळ आणि सुरेल हिंदी-मराठी गीतांचा नजराणा यातून रसिकांवर स्वरांची बरसात झाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित ‘ही पौर्णिमा स्वरांची..’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. आज (दि. ६) रोजी सायंकाळी पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रिती पेठकर, प्रिया सप्रे, मनोज सेठीया, संजय कांबळे आणि रवींद्र शाळू या प्रथितयश कलाकारांनी आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिकांची सायंकाळ सजविली. हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळातील गाणी, हेमंतकुमार आणि तलत मेहमूद यांच्या गीतांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘वो शाम कुछ अजिब थी’, ‘याद किया दिल ने’, ‘भंवरा बडा नादान’, ‘कही दिप जले कही दिल’, ‘न तुम हमें जानो’, ‘पुकारलू तुम्हारा इंतजार है’ यांसारखी सदाबहार हिंदी गीते आणि ‘मी डोलकर’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यांसारख्या मराठी गीतांनी कोजागिरीची सायंकाळ अविस्मरणीय केली.
पुण्यातील ज्येष्ठ गायक विजय केळकर यांनी ‘जिंदगी कैसी है पहेली हाए’ हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे निवेदन ममता क्षेमकल्याणी आणि निलाक्षी महाडिक यांनी केले.
कलाकारांचा सत्कार किशोर सरपोतदार यांनी केला, तर अजित कुमठेकर यांनी संयोजन केले.
डॉ. प्रसाद पिंपळखरे, डॉ. संजीव वेलणकर, राजेश दातार, आनंद सराफ, दत्तात्रय तापकीर, डॉ. भवाळकर, संगीता माने आणि प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर