कोल्हापुरातील कुख्यात गब्बर गॅंगवर दुसऱ्यांदा मोक्का; विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी

कोल्हापुरातील गब्बर गँगवर दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मुख्य गुन्हेगार आदित्य उर्फ गब्बर सुर्यवंशी, अनिकेत सुर्यवंशी, तुषार कुमठे, सुजल ढेरे, ओंकार समुद्रे आणि प्रतीक नागावकर यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

आदित्य ऊर्फ गब्बर अमर सूर्यवंशीसह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, जखमी करणे अशा तब्बल २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ‘फाळकुटदादा’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘गब्बर’ या नावाने ही टोळी सक्रिय होती. संघटित गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी वाढीव कलमांसह मोक्का लागू केला आहे.

पोलिसांनी या कारवाईसोबतच पीडितांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन देखील केले आहे. या निर्णयामुळे गब्बर गँगवर आणखी एकदा कायद्याचा धाक बसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी श्रीकांत पाटील