LED मासेमारी विरोधात मुरुड मध्ये कोळी समाज बांधवांचे जन आंदोलन

15

रायगड, ६ फेब्रुवारी २०२४ : रायगडच्या मुरुड एकदरा येथील कस्तुरी बोटीतील नाखवा आणि खलाशी खोल समुद्रात मासेमारी करिता गेले असता त्या ठिकाणी एल ई डी मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय लोकांनीं कस्तुरी नौबोटीतील नाखवा आणि खलाशांना मारहाण केली. ही बातमी स्थानिक मच्छिमारांना मिळताच मुरुड शहरासह पंचक्रोशीतील अनेक कोळी बांधव आणि महिलांनी कोटेश्वरी मंदिराजवळ एकत्र येत खलाशांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी अवैध एलईडी मासेमारी बंद करावी अशी मागणी करण्यात आली.

घटनेची हकीकत अशी की, माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छीमार सहकारी संस्थेची यंत्रचलीत नौका कस्तुरी या नौकेच्या बोट मालक – धुर्वा गोपाल लोदी व खलाशी-सुरेश पांडुरंग आगरकर व त्यांचे सहकारी असे १२ मच्छिमार खोल समुद्रात मासेमारी करत होते. यावेळी अलिबाग साखर अक्षी येथील खंडोबा प्रसन्न व नवदुर्गा अश्या आठ नौका बेकायदेशीर एल ई डी लावुन पणे मासेमारी करत असल्याचे आढळून आले. या नौका मध्ये असणारे परप्रांतीय यांनी कस्तुरी नौका मध्ये घुसुन चोरी व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नौकांची नासधूस केली. यावेळी या परप्रांतीयांनी बोटीतील डिझेल तसेच मासेमारीचे सामान देखील घेऊन पलायन केल्याची बाब उघडकीस आली. कस्तुरी बोट मालक- धुर्वा लोदी व सुरेश आगरकर यांना जास्त प्रमाणात मारल्याने बोटीमधील खलाशीनी आपली बोट समुद्र लगत आणुन दोघांनातात्काळ मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

यावेळी महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी राजपुरीचे चेअरमन – विजय गिदी, हनुमान मच्छीमार सोसायटी एकदराचे चेअरमन – पांडुरंग आगरकर,माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन – जगन वाघरे,,जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन – प्रकाश सरपाटील, आदिंसह शेकडो महिला व कोळी बांधव उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर