नसरापूर, ११ जून २०२३ : गुंजवणी प्रकल्पाचे पाईप टाकण्यासाठी शेतजमिनी उकरल्या जात आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार एल अँड टी ठेकेदाराकडून कामे होत नाही. ढोबल कारभारामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे असा आरोप करत जोपर्यंत न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत काम करु देणार नाही असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी काम बंद पाडले. गुंजवणीतून पुरंदर तालुक्यात पाणी नेण्यासाठी पाइप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप मसूरकर-कोळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. शासन दरबारी न्याय मागुन देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. उलट, आमच्यावरच दबाव टाकला जात आहे. असे गणेश मसुरकर, सीताराम फदाले, संतोष मसुरकर, महादेव पडवळ, अजित शिंदे, धनंजय पोमण, पांडुरंग मसुरकर आदींनी सांगितले आहे.
याबाबत एल अँड टीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. उकरलेल्या गौणखनिजाची विल्हेवाट न लावल्याने दगड, धोंडे तसेच पडून आहेत. शेतातील पाण्याचे प्रवाह गायब झाले आहेत. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उकरण्यात आला आहे. अशा विविध बाबींमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळे काम बंद करण्याचा ठराव करुनदेखील काम सुरू असल्याचे सरपंच लता मसुरकर यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर