पॅरिस २३ मे २०२३: कान्स चित्रपट महोत्सवात अजय देवगण आणि तब्बू अभिनित ‘दृश्यम’ चित्रपटाचा कोरियामध्ये रिमेक करण्याची घोषणा करण्यात आली. आता दृष्यम फ्रँचायझी देशाबरोबरच परदेशातही पाऊल ठेवणार आहे. कोरियन रिमेकमध्ये अजय देवगणचे पात्र ‘पॅरासाइट’ चित्रपटाचा कलाकार ‘सॉन्ग कॉग हो’ साकारणार आहे, ‘पॅरासाइट’ ने २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर किताब जिंकला होता. दृष्यम हा दक्षिण कोरियामध्ये रिमेक होणारा हा पहिला भारतीय चित्रपट असेल. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
भारतीय निर्मिती कंपनी पॅनोरमा स्टुडिओ आणि वॉर्नर ब्रदर्सचे माजी कोरियन प्रमुख जे चोई, यांच्या अँथॉलॉजी स्टुडिओने रिमेकसाठी करार केला आहे. तसेच, ‘पॅरासाइट’चा अभिनेता सॉन्ग कांग हो आणि दिग्दर्शक किम जी वून यांनी कोरियन रिमेकसाठी भागीदारी केली आहे. कोरियन भाषेत अधिकृतपणे बनवलेला ‘दृश्यम’ हा पहिला रिमेक असेल. हिंदी दृष्यम हा २०१३ बनलेल्या मल्याळम चित्रपट ‘दृश्यम’चा रिमेक आहे. दृश्यमचा आतापर्यंत केवळ हिंदीच नाही तर कन्नड, तेलगू आणि तामिळमध्येही रिमेक झाला आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे सर्व रिमेक यशस्वी झाले आहेत. हिंदी आणि कोरियन प्रॉडक्शन हाऊस पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दृष्यम हा भारतीय चित्रपटाचा रिमेक असला तरी कोरियन प्रेक्षकांना लक्षात घेऊन अनेक बदल केले जातील.
या बाबत बोलताना अँथॉलॉजी स्टुडिओचे सह-संस्थापक जे चोई म्हणाले की, कोरिया आणि भारत यांच्यातील या पहिल्या प्रकल्पाचे माझ्यालेखी खूप महत्त्व आहे. कोलॅबरेशन च्या माध्यमातून आम्ही भारतीय आणि कोरियन सिनेमातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पडद्यावर आणू. कोरियन मध्ये आम्ही एक अर्थपूर्ण रिमेक बनवू जो मूळ चित्रपटाप्रमाणेच उत्कृष्ट असेल.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.