Kothrud Redevelopment: शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेला पुनर्विकासाचा प्रवाह आता कोथरूडमध्ये अधिक प्रभावीपणे जाणवत आहे. एकेकाळी दोन ते चार मजल्यांच्या इमारतींनी कोथरूडला एक खास ओळख दिली होती. त्यावेळचे सधन नागरिक आणि स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी या भागात आनंदाने नांदत होते. आता काळ बदलला आहे आणि कोथरूड शहर पुनर्विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे, ज्याला नागरिकांचीही मोठी पसंती मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि याचमुळे बांधकाम व्यावसायिकांकडून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. पुनर्विकास हा खरं तर सोसायटीतील रहिवासी आणि विकासक दोघांसाठीही फायद्याचा सौदा ठरत आहे. रहिवाशांना नवीन, आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण घरे मिळतात, तसेच त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळातही वाढ होण्याची शक्यता असते.
कोथरूडमध्ये वाढता पुनर्विकास; नागरिकांची गरज की शहरी मजबुरी?


पुणे शहराचे महत्त्व ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून नेहमीच वाढत आले आहे. त्यात आता आयटी हब म्हणून आणखी एका नवीन ओळखीची भर पडली आहे. त्यामुळे कोथरूडसारख्या भागात पुनर्विकासाला अधिक चालना मिळत आहे. जुन्या इमारतींची देखभाल करणे आता खर्चिक आणि त्रासदायक झाले आहे. पार्किंग, पाण्याची समस्या आणि वाढती कुटुंबसंख्या यांसारख्या अनेक अडचणींमुळे नागरिक आता पुनर्विकासाला अधिक महत्त्व देत आहेत. आपल्याच विभागात चांगल्या आणि आधुनिक घरात राहण्याची संधी पुनर्विकासातून मिळत असल्याने अनेकजण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
पुण्यात सध्या सर्वत्रच पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. रस्त्यावरून जाताना निळ्या पत्र्यांनी वेढलेल्या इमारती हे आता नित्याचे दृश्य झाले आहे. विस्तारित पुण्यामध्ये हे प्रमाण कमी असले तरी, पेठांचा भाग, डेक्कन जिमखाना, सहकारनगर, नवी पेठ, कर्वेनगर आणि कोथरूड यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती नव्याने उभ्या राहत आहेत. ४० ते ५० वर्षे जुन्या झालेल्या या इमारती आता पुनर्विकासाच्या माध्यमातून नवा श्वास घेत आहेत.
या बदलांबरोबरच काही आव्हाने आणि त्यावरचे उपाय शोधणेही महत्त्वाचे आहे. कोथरूडमधील वाहतूककोंडी ही एक मोठी समस्या आहे. मात्र, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे आणि प्रस्तावित रिंग रोडमुळे भविष्यात ही समस्या कमी होण्याची शक्यता आहे. नवीन बांधकामांमुळे पर्यावरणावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, परंतु ग्रीन बिल्डिंगच्या संकल्पनेचा वापर करून आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखता येऊ शकतो.
वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनावर ताण येऊ शकतो, परंतु प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यास यावरही मात करता येईल.
कोथरूडमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे येथील घरांच्या मागणीत आणि दरात वाढ झाली आहे. तसेच, प्रस्तावित रिंग रोडमुळे शहराच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, ज्यामुळे या भागातील विकासाला आणखी गती मिळेल. पुनर्विकासाच्या माध्यमातून आधुनिक वास्तुकलेची आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त घरे आता कोथरूडमध्ये उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे हे शहर खरंच एक आधुनिक आणि आकर्षक निवासस्थान बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे