५ दिवसांत संसार मोडला! ‘तू पसंत नव्हतीस’ म्हणत छळ; अखेर पतीने पत्नीला दिले ४५ लाख रुपये पोटगी

केवळ पाच दिवसांचा संसार करून ‘तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केल्याने लग्न केले,’ असे सातत्याने बोलून पत्नीचा मानसिक छळ करणाऱ्या पतीने तिला अखेर ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली आहे. लग्नात हुंडा न मिळाल्याच्या कारणावरून नववधूला ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांविरोधातील गुन्हाही या निर्णयामुळे मागे घेण्यात आला आहे.

राकेश आणि स्मिता (बदललेली नावे) यांचा विवाह २९ जानेवारी २०२२ रोजी झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते’ असे बोलून तिचा मानसिक छळ सुरू केला. याशिवाय सासू, सासरा आणि नणंदेने हुंड्याच्या कारणावरून तिला त्रास देणे सुरू केले आणि अखेर तिला घराबाहेर काढले. पतीनेही नंतर फोन घेणे आणि भेटणे टाळले. या मानसिक त्रासामुळे स्मिताने भोसरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणावर लवकर तोडगा काढण्यासाठी दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात दाखल केला. पतीने स्मिताला एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याचे मान्य केले, तर पत्नीने सासरच्यांविरोधातील कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा आणि संबंधित दावा मागे घेतला. या महत्त्वपूर्ण समझोत्यानंतर अवघ्या एका वर्षात हा कौटुंबिक हिंसाचाराचा आणि घटस्फोटाचा दावा निकाली निघाला असून, न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. पत्नीतर्फे अॅड. प्रियंका काटकर आणि अॅड. रेश्मा सोनार यांनी बाजू मांडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे