शिरूर: दि. ३ ऑगस्ट २०२० : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासोबतच तातडीने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी, तसेच ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करावे, असे निर्देश कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले.
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज रविवारी शिरूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी शिरूर तालुक्यातील प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की , कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे , अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घ्यावी तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून यापुढील काळात अधिक काळजी घ्यावी लागणार असून नागरिकांनी यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नियमांचे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे











































