काठमांडू, २६ सप्टेंबर २०२०: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला आभासी माध्यमातून संबोधित केलं. यावेळी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली म्हणाले की, नेपाळ आपल्या प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी दृढ वचनबद्ध आहे. तसंच पंतप्रधान ओली यांनी कोरोना विषाणूच्या विषयावरही भाष्य केलं.
सध्या भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये सीमा विवाद सुरू आहे. आता युएनच्या भाषणात नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी कोणत्याही देशाचं नाव न घेता सीमा वादाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी सांगितलं की, नेपाळची सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी आणि शेजार्यांशी आणि जगातील इतर सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी दृढ वचनबद्ध आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे यूएन जनरल असेंब्लीच्या ७५ व्या सत्राला संबोधित केलं. या दरम्यान ते म्हणाले की, सध्याच्या साथीच्या रोगाचा परिणाम जीवन, अन्न, समाज आणि अर्थव्यवस्थांवर झाला आहे. लोकांना रोग आणि उपासमारीपासून संरक्षण देणं हे सरकारांचं सर्वोच्च कर्तव्य होतं. तसेच, ओली यांनी कोरोना लस कमी दरात उपलब्ध व्हावी या बद्दल मत मांडलं.
ते म्हणाले की गरीबी, शस्त्रास्त्रांची शर्यत, भू-राजकीय टक्कर, दहशतवाद, व्यापार तणाव, जागतिक असमानता आणि आपत्ती यासारख्या आव्हानांमुळं जगातील बर्याच भागात शांतता आणि शाश्वत विकासाची वाढ थांबलीय. या व्हायरस’नंच विकृतींची गंभीरता जगासमोर आणलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे