कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, वाहतूक ठप्प

सांगली, २४ जुलै २०२१: सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे वारणा नदीला पूर आला आहे तर कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील या दोन प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून वारणा, मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.

गुरूवारी सकाळपर्यंत वारणावती येथे १७५ मि. मी. पाऊस झाला. चांदोली धरणातील पाण्याचा साठा दोन टीमसीने वाढला आहे. एकूण पाणीसाठा २८.२ टीएमसी झाला आहे. कोकरूड – रेठरे, चरण – सोंडोली, मांगले – सावर्डे हे प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

सांगली शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला. सर्वत्र संततधार सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यात ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हामार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा, पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक अन्य मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. दरम्यान, शिराळा – इस्लामपूर राज्यमहामार्गावर शिराळा येथे झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा