कृषिक प्रदर्शनात होणार पोषण मूल्यावर आधारित पिकांचा समावेश

26

बारामती : शारदानगर येथे कृषी विज्ञान केंद्रात १६ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या `कृषिक` प्रदर्शनात पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीलाही विशेष महत्व दिले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली (NARI) नारी उपक्रमांतर्गत युनिसेफच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राने १ एकर क्षेत्रावर पोषणमूल्य आधारित ४३ प्रकारच्या देशी पिकांची वैशिष्ठपूर्ण लागवड केली आहे.
संतुलित आहार आणि शेती पद्धतीमध्ये पोषणमूल्य आधारित पिकांचा समावेश करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध शेती पद्धतींच्या पर्यायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जावी. तसेच याची जागरूकता होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना यंदाच्या कृषिक प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डाॅ. सय्यद शाकीर अली यांनी केले आहे.
यावेळी अली म्हणाले की, “ संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की फक्त शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी देखील आहारामध्ये सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे. ते पोषणमूल्य आधारित शेती पद्धतीमुळे शक्य होईल. या प्रकल्पांतर्गत बारामतीमधील मळद, गुणवडी व नीरावागज गावातील २०० शेतकऱ्यांना समाविष्ट केले आहे.“

पोषणमूल्य आधारित शेतीपद्धतीचे फायदे
कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या जास्तीत जास्त प्रकारच्या अन्नधान्याचे उत्पादन आपल्याच शेतीतून घेता येते, एकापेक्षा अधिक पिके उपलब्ध झाल्यामुळे सर्व प्रकारच्या अन्नधान्याचा आहारात समावेश होईल आणि कुटुंबाच्या पोषणाचा दर्जा सुधारेल, मधुमेह व हृद्यरोगासह विविध आजारावर आपल्याला बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आणता येऊ शकते, एकच एक पिकपद्धतीमुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान टळू शकते, कमी क्षेत्र असूनही अधिक अर्थिक नफा
मिळविता येऊ शकतो, पोषणमुल्य शेतीपद्धतीमध्ये अधिक पिके असल्यामुळे एका पिकास भाव कमी मिळाला, तरी इतर पिकांमधून अधिक अर्थिक फायदा शेतकऱ्यास मिळू शकतो.

कृषिकमध्ये पाहायला मिळणार दुर्मिळ देशी वाण
धान्यामध्ये काळा गहू, बोडका गहू, गवती गहू व खपली गहू इत्यादी देशी वाणाचा समावेश आहे. तसेच भाजीमध्ये उलटी मिरची व फुले ज्योती, मांजरी गोटा वांगी, लाल आणि पांढरी भेंडी, फुले विमुक्ता, देशी गाजर, गुळभेंडी, कसुरी मेथी, आणि कुचकुरली पहावयास मिळणार आहे. कडधान्यांमध्ये
काटाळ हरभरा, घेवडा, काळा व हिरवा मुग, पावटा, गोल शेंदाड, कारले, भोपळा, दोडका आदी पिकांचा समावेश आहे.