पुणे दि. ११ मे २०२० : पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी कोविड-१९ च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा प्रमुख व समन्वयकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साखर आयुक्त तथा कोविड-१९ नियंत्रण अधिकारी सौरभ राव, एनआयव्ही च्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच शासकीय व खाजगी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये सध्या मोठया प्रमाणात कोविड-१९ चे सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. विशेष करुन पुणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने या भागातून सॅम्पल अधिक येत आहेत. या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. प्रयोगशाळांसाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी तसेच इतर साहित्य गरजेनुसार प्रशासनाकडून पुरवले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रयोगशाळांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगून जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आवश्यक बाबींसाठींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करावेत, जेणेकरून त्याची पूर्तता करता येईल.
न्युज अनकट प्रतिनिधी: