मजुराचा मृत्यू ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस

पुणे महापालिकेच्या ‘जायका’ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने कठोर पाऊले उचलत, संबंधित मूळ ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे.

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नांदेड गावात, नांदेड सिटीजवळ ‘जायका’ प्रकल्पाचे काम सुरू असताना हा अपघात घडला. सांडपाणी वाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना बाजूला असलेला मातीचा ढिगारा अचानक कोसळला. यात चार मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या गंभीर घटनेनंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जखमी मजुरांची रुग्णालयात जाऊन विचारपूसही केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पालिकेचा सांडपाणी व्यवस्थापन विभाग या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करत असून, तो ‘जायका’ संस्थेलाही पाठवला जाईल. पुढील आदेश येईपर्यंत या प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे.

या प्रकरणात केवळ ठेकेदारच नव्हे, तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता आहे. आयुक्तांनी सांगितले की, “या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”

मूळ ठेकेदाराने हे काम सबकॉन्ट्रॅक्टने दिले असल्याने, या प्रक्रियेत काही नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. मृताच्या नातेवाईकांना विमानातून पुण्यात आणण्यात येत असून, मृतदेह गावी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे