देशातील बर्‍याच राज्यात कोरोना लसीचा अभाव! वाराणसीत निम्मी लसीकरण केंद्रे बंद

नवी दिल्ली, ८ एप्रिल २०२१: लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकून भारत सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनला आहे. बुधवारी पहाटेपर्यंत २४ तासांत लसीकरणाचे ३३ लाख डोस देण्यात आले. आतापर्यंत देशात एकूण ७.७ कोटी डोस लस देण्यात आले आहेत. परंतु दुसरीकडे काही राज्यांनी लसीच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला असून केंद्राकडून पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र:

महाराष्ट्रातील आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आमच्या लसीकरण केंद्रांवर लसांचा पुरेसा साठा नाही. जे लस घेण्यासाठी आले त्यांना परत जावे लागत आहे. आमची बरीच केंद्रे लस नसल्यामुळे बंद करावी लागली आहेत. आम्ही केंद्राकडे अधिक लसींची मागणी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मंगळवारी आमच्याकडे १,७६,००० साठा होता, परंतु आम्हाला आणखी स्टॉकची आवश्यकता असेल.

वाराणसी:

लस नसल्यामुळे वाराणसीतील ६६ सरकारी लसीकरण केंद्रांपैकी बुधवारी केवळ २५च केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. जिल्हा लस साठवण केंद्रांवरही टाळे लागलेले दिसून आले. ही लस किती काळ पुरेल हे आरोग्य विभागालाही माहिती नाही. शहरातील चौकाघाट येथील जिल्हा लस साठवण केंद्रांवरही टाळे होते, तर जवळच असलेल्या चौकाघाट शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व देल्हेरिया सामुदायिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाचे काम थांबले आहे.

आंध्र प्रदेशः

आंध्र प्रदेशनेही केंद्र सरकारला पत्र लिहून एक कोटी डोस लस देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारचे म्हणणे आहे की फक्त ३.७ लाख डोस शिल्लक आहेत, तर राज्यात दररोज १.३ लाख डोस वापरले जात आहेत. लवकरच राज्यात लसांचा साठा संपेल. काही जिल्ह्यांमध्ये ही लस संपली आहे. राज्याचे मुख्य सचिव आदित्यनाथ दास यांनी केंद्राला पत्र लिहून तातडीने १ कोटी डोस देण्याची मागणी केली आहे. गेल्या २४ तासांत आंध्र प्रदेशात २,३३१ प्रकरणे आणि १८ मृत्यू झाले. ओडिशानेही केंद्राकडे २५ लाख डोस तत्काळ देण्याची मागणी केली आहे.

झारखंड:

झारखंडमध्येही लसीची कमतरता आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी राज्यात ४ ते १४ एप्रिल दरम्यान एक विशेष मोहीम सुरू झाली, परंतु लस नसल्यामुळे या मोहिमेचा वेग मंदावला. मंगळवारी अनेक केंद्रांवर लसीकरण थांबविण्यात आले. राज्यात लसीचा साठा दोन दिवसात संपेल. असे सांगितले जात आहे की तीन दिवसांत लसीकरणाची कामे न झाल्यास झारखंडमधील लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल.

केंद्राने राज्यांचे अपयश सांगितले

या लसीचे प्रकरणही राजकीय रंग घेत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी कोरोना लसी राज्यांच्या मागणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या स्तरावर राज्यांचे अपयश लपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील सर्व लाभार्थ्यांना लस दिली आहे का, असा सवालही त्यांनी केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा