निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबकनगरी दुमदुमली

पुणे, १९ जानेवारी २०२३ : संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त ‘सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, धन्य धन्य निवृत्ती देवा… समाधी त्र्यंबक शिखरी…. मागे शोभे ब्रह्मगिरी…असा महिमा वर्णावा किती’ असे म्हणत टाळ- मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या भक्तिभावाने त्र्यंबकनगरी दुमदुमली.

बुधवारी (ता.१८) पहाटेच्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा केली. यावेळी दर्शनाचा पहिला मानकरी होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दांपत्याला मिळाला.

कोरोनामुळे सतत दोन वर्षे यात्रेत खंड पडला होता; पंरतु यंदा परिस्थिती आटोक्यात आल्यानेत्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव साजरा झाला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी परिसर फुलला असून, गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजली आहे.

त्याचबरोबर श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला असलेले महत्त्व यात्रेच्या वेळीही दिसून आले. यात्रोत्सवासाठी आलेल्या वारकऱ्यांनी काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरवात केली होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास कुशावर्तावर स्नानासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तर संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर संत निवृतीनाथांच्या यात्रेसाठी पायी दिंड्या निघाल्याने वारकऱ्यांसह भाविक समाधान व्यक्त करीत आहेत; तसेच त्र्यंबकच्या ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या उत्साहाने निवृतीनाथांचे दर्शन घेताना दिसत असून, यात्रोत्सवाचा आनंद लुटत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा