फलटण दि.२१ जून २०२३ : दक्षिण काशीत आला माऊलींचा मेळा । श्रीरामाच्या नगरीत विसावलाभक्तीचा मेळा॥ येथे मंत्रमुग्ध होतो वारकरी भोळा । स्नेहाने वाढतो माऊलींच्या भक्तांचा मेळा॥
महानुभाव व जैन धर्मियांची दक्षिणकाशी आणि अन्य धर्मियांची पुरातन मंदिरे असलेली आधुनिक काशी म्हणुन ज्या शहराचा उल्लेख होतो त्या फलटण शहरात कैवल्यसम्राट ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याचे आज बुधवारी सायंकाळी शाही स्वागत करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सायंकाळी ५.३० वाजता माऊलींच्या वैभवी लवाजम्याचे जिंती नाका फलटण येथे शहराच्या वेशीवर नगरपरिषद व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि फलटणकरांनी माऊलींचे मोठ्या भक्तीभावाने उत्साहात स्वागत केले.
दरम्यान सोहळा पालखी तळाकडे जात असताना भाविकांनी जिंतीनाका, सदगुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक येथे माऊलींचे स्वागत केले. मुधोजी मनमोहन राजवाडा व श्रीराम मंदिर येथे नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने व राजघराण्याचेवतीने माऊलींचे परंपरागत पध्दतीने स्वागत करुन दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, म. फुले चौक, सफाई कामगार कॉलनी, गिरवीनाका, शहर पोलीस ठाणे या मार्गाने येथील प्रशस्त पालखी तळावर पोहोचला.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहराला सदगुरु हरिबुवा महाराज, सदगुरु प.पू. उपळेकर महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या नगरीत महानुभाव धर्मसंस्थापक चक्रपाणी महाराजांचे जन्मस्थान आहे. साध्वी सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी काहीकाळ या संस्थानचा राज्यकारभार पाहिला त्याच परंपरेतील राणीसाहेब श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर या माऊली भक्त होत्या एकेवेळी विमानातून जाताना ज्ञानेश्वरी वाचत असताना विमानाला झालेल्या छोट्याश्या अपघातात त्या बचावल्या त्यावेळी त्यांच्या हातातील ज्ञानेश्वरी ग्रंथाचे काही प्रमाणात नुकसान झाले मात्र फलटण संस्थानने आणि आजच्या नाईक निंबाळकर घराण्याने ज्ञानेश्वरीची ती प्रत एक ठेवा म्हणून आजही जतन करुन ठेवली आहे. या घराण्याची माऊलींवर अपार श्रध्दा आहे.
फलटण शहरातील लाखो वैष्णव जणांचा मेळा दाखल होताच ज्ञानोबा माऊली चा जयघोष करत फलटण नगरी त त्यांची ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. फलटण येथील विमानतळावरती माऊलींचा मुक्काम असून त्या ठिकाणी पालखी विसावली आहे. शहर व तालुक्यातील भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार