‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नाव बदलण्याची मागणी

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावावरून सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव हेतूतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय हिंदू सेनेने केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘लक्ष्मी बॉम्ब’ वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे नाव बदलले नाही, तर प्रदर्शनाच्या वेळी त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर निषेधात्मक आंदोलन करतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. हिंदू सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीत, ‘लक्ष्मी बॉम्ब’ बनवणाऱ्या निर्मात्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कारण या चित्रपटाच्या नावातून देवी लक्ष्मी आणि हिंदूंचा अपमान केला आहे’, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एका भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा