बिहार, ४ ऑक्टोबर २०२३ : ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आरजेडीच्या खासदार मीसा भारती यांना कथित ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी लालू यादव यांच्यासह राबडीदेवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती आज राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाले होते.
न्यायालयाने सर्वांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. २००४ ते २००९ दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालूप्रसाद यांच्या कुटुंबाला नोकरीच्या बदल्यात जमीन विकल्याचा अथवा थेट दिल्याचा आरोप आहे. ६ मार्चला सीबीआयने राबडीदेवी यांची पाटणातील निवासस्थानी तीन तास चौकशी केली होती. लालूप्रसाद यांचीदेखील दिल्लीत चौकशी केली केली होती. दहा मार्चला ईडीने यादव यांच्या घरांवर छापे टाकले होते.
ऑक्टोबर २०२२ मध्ये लालू प्रसाद आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सीबीआयच्या आरोपपत्रात मध्य रेल्वेमध्ये नियमांचे मार्गदर्शक तत्त्वांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करुन उमेदवारांच्या अनियमित, बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. सीबीआयने अलीकडेच लालूप्रसाद यांच्यावर खटला चालवण्यास अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने लालू आणि इतरांना समन्स बजावले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर