पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु, पुणेकरांची वाहतूक कोडींतून सुटका होणार

पुणे, ९ जुलै २०२३ : पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. पुण्याचे नागरिकरणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. पुणे शहरात वाहनांची संख्या जास्त आहे. परंतु रस्त्यांना मर्यादा आहेत. यामुळे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभराचा वेळ पुणेकरांना लागतो. परंतु ही समस्या लवकरच सुटणार आहे. त्यासाठी असलेल्या २७ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणासाठी पाच हजार जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. हवेली, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यात ३२ गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर जुलै अखरेपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे.

पुणे शहराभोवती १७२ किलोमीटरच्या रिंगरोडचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीन मालकांना नोटिसा दिल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला डिसेंबर किंवा जानेवारी २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे.

रिंगरोड प्रकल्पासाठी शहराला वेढलेल्या ८७ गावांची एकूण १९०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ५ हजार ८०० कोटींचा निधी मिळाला आहे. प्रकल्पाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा